देश वाचविण्यासाठी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांची साथ आवश्यक - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



       रुग्ण व संशयितांचे आकडे वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शासनाकडून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत. या लढाईत दक्षता पाळून आपणही साथ द्यावी. आपण स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करणे हे देश वाचविण्यासाठी महत्वाचे आहे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
      कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सद्य:स्थिती व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर या जिल्हा प्रशासनाकडून रोज आढावा घेत आहेत.  त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की, कालपर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या एक होती. मात्र, काल सायंकाळी तीन आणखी पॉझिटिव्ह अहवाल आले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे. ही बाब चिंता करण्यासारखी असली तरी कुणीही घाबरून जाऊ नये. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. मात्र, आता आपल्याला थोडाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. या लढाईत आपल्या सर्वांची साथ मिळणे जरूरीचे आहे.
      कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी मदतकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याला अनुसरून आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता  covidyoddha@gmail.com    या ई मेल वर नोंदवावे,  असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.
            त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, 3 हजार 966 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यापैकी एका निधन झालेल्या व्यक्तीचा अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. आता आणखी तिघाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्थापित कोविड-19 रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत. आपली वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट आदी सर्व अहोरात्र सेवा देत आहेत.
            या अहवालानुसार आतापर्यंत स्वॅब तपासणीसाठी 238 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील 170 नमुन्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 19 रिजेक्टेड आहेत. 45 अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, वैद्यकीय पथकांकडून सर्वदूर तपासण्या होत असून, आवश्यक तिथे थ्रोट स्वॅबही घेण्यात येत आहेत. चाचणी अहवाल लवकर मिळावेत, यासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात येणार आहे. अमरावतीतदेखील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय यांच्या समन्वयाने प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल.
        या काळात अद्ययावत उपकरणे, चाचणी यंत्रणा व इतरही आवश्यक वस्तू निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. मास्कनिर्मितीच्या कामात अमरावती कारागृहातील बंदीजन, तसेच महिला बचत गटांचे योगदान मिळत आहे. त्याचप्रमाणे, सॅनिटायझर व आवश्यक बाबींसाठीही प्रयत्न होत आहेत. आपल्या आवाहनाला अनुसरून आमदार रोहित पवार यांनी जिल्ह्यासाठी 500 लीटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. आम्ही ते जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले आहे. नागरिकांच्या सेवेत अहोरात्र राबणा-या आरोग्य, पोलीस आदी यंत्रणांच्या कर्मचा-यांना ते वितरीत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
       लॉकडाऊनमुळे आपली सर्वांची काहीशी गैरसोय होत असली तरी आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर  शिस्त आणि संयम हीच शस्त्रे आपल्याला आज वापरावी लागतील. संयमातही मोठी ताकद आहे. हा आपल्या सर्वांसाठी परीक्षा पाहणारा काळ आहे. मात्र, यावरही मात करून आपण पुढे जाऊ, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे काळजी घ्या. शक्यतो घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असाल तर पुढचे काही दिवस मास्क वापरलेच पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने, दुपट्ट्याने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. कापडी मास्क स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. ताप, खोकला आदी कुठलीही लक्षणे आढळली तर लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करा. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातूनच साथरोगावर नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती