विशेष तपासणी मोहिमेत 18 लाख नागरिकांशी संपर्क - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

सोशल डिस्टन्सिंग पाळा; बेशिस्ती हे संकटाला निमंत्रण
                   

अमरावती, दि. 6: कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत सुरु ठेवलेली आहेत.  मात्र अद्यापही नागरिक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे, सावध व्हावे, गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.   
          जिल्ह्यातील नागरिकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जगाला संयम आणि अहिंसेचा मार्ग दाखविणा-या महावीरांची शिकवण सध्याच्या स्थितीत सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. जगा आणि जगू द्या, हा संदेश महावीरांनी दिला. सद्य:स्थितीत या संदेशाचे मोल प्रकर्षाने जाणवते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वत:ही संयमी राहून गर्दी टाळणे व दक्षता पाळणे आणि इतरांनाही सुरक्षित करणे गरजेचे आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जीवनावश्यक वस्तूंची वितरण साखळी सुरळीत ठेवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, नागरिकांनी या काळात सजग राहणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेच पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत प्राप्त अहवालांनुसार निधन झालेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. मात्र, अद्याप 121 अहवाल प्रलंबित आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे. 
त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. कुणातही लक्षणे आढळत असतील तर स्पष्टपणे माहिती द्यावी. कुठलीही लक्षणे आढळली तर पटकन उपचार करून घ्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो. त्यामुळे उगाच माहिती लपवून धोका वाढवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
                                      जिल्ह्यात 18 लाख नागरिकांशी संपर्क
त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका व गावोगाव आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आदींमार्फत विशेष मोहिमेत घरोघर तपासणीद्वारा अद्यापपर्यंत सुमारे 18 लाख व्यक्तींशी संपर्क होऊन माहिती संकलन होत आहे. या सर्वेक्षणात प्राथमिकरित्या 17 हजार व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला असल्याचे आढळून आले. मात्र, प्रत्येक सर्दी, ताप, खोकला हा काही कोरोना नसतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. मात्र, तरीही दक्षता म्हणून या व्यक्तींशी नियमित संपर्क ठेवून माहिती घेण्यात येणार आहे. त्यासाठी कॉल सेंटर्स सुरु करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रूग्णालयांतून हे संनियंत्रण केले जाईल. या सर्वांचा ट्रॅक ठेवला जाईल व आवश्यक वाटल्यास तपासणी, चाचणी करण्यात येईल. हे काम काटेकोरपणे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
          त्या पुढे म्हणाल्या की, सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्वतंत्र कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. तिथे दाखल नागरिकांची गैरसोय होऊ नये, असे निर्देश दिले आहेत. तिथे संशयिताकडून स्वॅब मिळवताना प्रत्यक्ष संपर्क टाळला जावा व वैद्यकीय तंत्रज्ञाची सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्पेशल बॉक्सही बनविण्यात आला आहे. तिथे जंतुनाशक फवारणीसाठी अद्ययावत यंत्रणा मिळविण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत.  
          या काळात खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद  ठेवू नयेत. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी शासकीय दवाखान्यात किंवा कोविड रूग्णालयात जावे. परंतु इतर रुग्णांना डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी. सध्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी मोठी आहे आणि एखाद्या योद्ध्यासारखे ही मंडळी जीवाची बाजी लावून लढत आहेत. त्यांचे मनोबल आपण सर्वांनी मिळून वाढवायला हवे. त्यासाठी स्वत:  दक्षता पाळणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे स्वत: दक्षता पाळून इतरांनाही सुरक्षित करा, असे आवाहन त्यांनी केले.
                             000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती