झारखंडच्या सौरवचा पहिला वाढदिवस तिवस्यात आनंदाने साजरा तिवसा निवारागृहातील उपक्रम




घर शेकडो किलोमीटर दूर. त्यात मुलाचा पहिला वाढदिवस. आनंदाचा हा क्षण साजरा करायचा तरी कसा? असाच प्रश्न यादव कुटुंबियांच्या मनात उभा राहिला; पण तिवसा निवारा केंद्रातील अधिकारी- कर्मचा-यांनी यादव कुटुंबियांचा हा आनंदाचा क्षण वाया जाऊ दिला नाही. वाढदिवसासाठी केक आणि सगळे साहित्य आणून सर्वांनी मिळून सौरवचा पहिलावहिला वाढदिवस तिवस्याच्या निवारा केंद्रात साजरा केला.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू झालेली असताना मूळ झारखंड येथील करण यादव व त्यांचे कुटुंबिय तिवसा येथे अडकून पडले. प्रशासनाने तत्काळ ग्रामीण रूग्णालयात त्यांची आवश्यक तपासणी करून त्यांना निवारा केंद्रात दाखल केले व त्यांच्या निवास, भोजनाची सोय केली. अधिकारी- कर्मचा-यांकडून या सर्वांची वेळोवेळी आस्थेने चौकशी होते. सर्वांचा एकमेकांशी परिचय झाला असून, कुटुंबातील मुलांशीही प्रशासनातील सहकारी संवाद साधत असतात. अशा हितगुज साधण्यातूनच तिवसा येथील मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना करण यादव यांचा मुलगा सौरवचा वाढदिवस असल्याची माहिती मिळाली आणि यादव कुटुंबाच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण सर्वांनी मिळून साजरा करण्याचे त्यांनी ठरवले.
तहसीलदार वैभव फरताडे यांनी ही कल्पना उचलून धरली व तत्काळ सामग्रीची जुळवाजुळव सुरु झाली. संचारबंदीमुळे हलवायांची दुकाने व उपाहारगृहे बंद आहेत. त्यामुळे स्थानिक हलवायाच्या मदतीने घरातच एक छानसा केक बनविण्यात आला. एकाच्या घरी वाढदिवसासाठीची खास मेणबत्तीही मिळून गेली. ही सगळी तयारी पाहून यादव कुटुंबियही आनंदून गेले. निवारा केंद्राच्या आवारात सुरक्षित अंतर राखत सौरवचे कुटुंबीय, इतर नागरिक, कर्मचारी सगळे जमले. सर्वांनी मिळून सौरवचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व चिमुकल्यांना खाऊही देण्यात आला.
सौरवचा पहिलाच वाढदिवस असल्याने तो चांगला साजरा व्हावा, अशी इच्छा होती. प्रशासनाने आवर्जून सगळी तयारी केली. सामग्री आणून आमच्या आनंदात सहभागी होत आमचा हा क्षण अधिक आनंददायी केला. या आगळ्यावेगळ्या क्षणाची आठवण कायम राहील, अशी प्रतिक्रिया सौरवचे वडील करण यादव यांनी व्यक्त केली.
नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी सोटे, तहसीलदार वैभव फरताडे यांच्यासह विविध कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती