Tuesday, April 21, 2020

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील टंचाईनिवारण व पुरवठा कामकाजाचा आढावा




भातकुली येथे स्वतंत्र गोदामाची व्यवस्था व्हावी
        एकाही गावात पाणीटंचाई उद्भवता कामा नये
         -          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 21 : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, तसेच संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, अन्नधान्य वितरण व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे. या काळात ग्रामीण भागात पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी तात्कालिक योजना राबविण्यासह दीर्घकालीन उपायासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामेही गतीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा व पुरवठा कार्यवाही यांच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठका  जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन विविध कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह जलसंपदा व उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना काहीशी खीळ बसली. मात्र, नागरिकांच्या सुविधेसाठी काही अत्यावश्यक सेवा व विकासकामे खोळंबू नयेत, यासाठी काही कामांना चालना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण, तसेच टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा नियमित होणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी वीजपुरवठा खंडित होता कामा नये. शहानूर प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावांना नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार होत आहे. तिथे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. टँकरने पाणीपुरवठा होत असेल तर टँकर सुस्थितीत असावेत. गळती होता कामा नये. प्रत्येक बाबी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, पथ्रोट परिसरात टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे.  त्यामुळे चारघड प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे कुठल्याही परिस्थितीत एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करावीत. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ग्रामपंचायतनिहाय निधी 14 व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार कामांचे नियोजन करावे व विहित मुदतीत प्रत्येक काम पूर्णत्वास न्यावे. खरीप हंगामाच्या दृष्टीने आढावा बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
                       
 मेळघाटातील पाणीटंचाई दूर करण्यास प्राधान्य द्यावे
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटातील सर्व गावे यांचा आढावा घेऊन नियोजन करावे व तेथे एकाही गावात पाणीटंचाई भासणार नाही, याची काळजी घ्यावी.  मनरेगामधून विविध विकासकामे राबवून तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. पांदणरस्त्यांची कामे  टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास न्यावी. ही कामे करत असताना सोशल डिस्टन्स व इतर दक्षता पाळणे आवश्यक आहे. तशी दक्षता पाळली जात आहे किंवा कसे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.  
                भातकुली येथे स्वतंत्र गोदामाची व्यवस्था व्हावी
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचा आढावाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वतंत्र बैठकीद्वारे घेतला. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारा अन्नधान्य वितरण सुरळीत असणे गरजेचे आहे. त्यानुसार गहू, तांदूळ व इतर धान्यवाटपाबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सार्वजनिक वितरण प्रणालीत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र गोदाम असावे, असे शासनाचे धोरण आहे. तथापि, भातकुली येथे अद्यापही अमरावती गोदामातून पुरवठा होतो. त्यामुळे भातकुली येथे स्वतंत्र गोदामाची व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गोदामाची जागा, आवश्यक अधिकारी- कर्मचारी याबाबत परिपूर्ण  प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना 94 टक्के धान्यवाटप पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरितही पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली.
पीएम किसान योजनेत 2 लाख 40 हजार शेतक-यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील निधी वितरीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...