Monday, April 27, 2020

सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्यांनी नोंदणीस आधार क्रमांक लिंक करावा

सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्यांनी नोंदणीस आधार क्रमांक लिंक करावा
-कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आवाहन
उमेदवारांच्या सोयीसाठी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती, दि. 26 :  जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक तसेच नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला आधार कार्ड क्रमांक नोंदणीला जोडणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रामार्फत उपलब्ध करुन दिलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर  उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आपला आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाव्दारे करण्यात आले आहे.
            महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा-सुविधा ह्या उपरोक्त वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. या संकेतस्थळाच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळविणे आणि त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग घेणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती प्राप्त करणे तसेच त्यामध्ये सहभाग घेणे आदी महत्वपूर्ण कामे होतात.  
तसेच विभागाच्या सदर संकेतस्थळावर आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आदीमध्ये दुरुस्ती करणे तसेच वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी आपल्या उमेदवारीचा अर्ज सादर करणे इत्यादी बाबींची पूर्तता करता येते.
राज्यातील विविध उद्योजक आस्थापनांच्या वेळोवेळी मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी उमेदवारांच्या नोंदणीस आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
उपरोक्तप्रमाणे विविध बाबींचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या नोंदणीस आधार कार्ड जोडणी (लिंक) करावे. जेणेकरुन कुठलाही उमेदवार नोकरीच्या संधीपासून वंचित राहणार नाही. यासाठी सेवायोजन कार्यालयाकडे नोकरीसाठी नाव नोंदणी केलेल्या प्रत्येकांनी तत्काळ www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या नोंदणीस आपले आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने जोडावे आणि विभागाव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा. आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासाठी काही अडचण उद्भवल्यास कार्यालयाच्या 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com asstdiremp.amravati@ese.maharashtra.gov.in  या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...